महाराष्ट्र दिनानिमित्त संगमनेरमध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला; आमदार अमोल खताळ यांची उपस्थिती

0
105

संगमनेर – आज महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त संगमनेर येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील उपस्थित राहून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन केले. ध्वजारोहणप्रसंगी त्यांनी ध्वजाला मानवंदना दिली आणि महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण भावपूर्ण शब्दांत केले.

१९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हजारो आंदोलनकर्त्यांच्या बलिदानातून, असंख्य मराठी बांधवांच्या संघर्षातून मराठी भाषिक राज्याची निर्मिती झाली. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागातून जन्मलेला महाराष्ट्र आज कृषी, उद्योग, सहकार, शिक्षण, साहित्य, कलेपासून ते आधुनिक विज्ञान, संशोधन आणि माहिती तंत्रज्ञान यामध्ये देशात अग्रस्थानी आहे.

यावेळी आमदार अमोल खताळ पाटील म्हणाले की,महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांची नीती, महात्मा फुलेंची समता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, लोकमान्य टिळकांचे राष्ट्रप्रेम आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचे शिक्षणव्रत यावर उभी आहे. या थोरांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहिले पाहिजे.”

कार्यक्रमास संगमनेर तहसीलदार श्री. धीरज मांजरे, इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित सर्वांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचा गौरव पुन्हा अनुभवला आणि महाराष्ट्रासाठी योगदान देण्याची प्रेरणा घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here