महिलांनी ब्रिटीशांना झुगारत रथ ओढला ; तब्बल 100 वर्ष जुनी अनोखी परंपरा कायम

0
60

संगमनेर : ब्रह्मचारी असलेल्या हनुमंताचा रथ ओढण्याचा मान संगमनेरमध्ये हनुमान जयंतीला महिलांना दिला जातो. ब्रिटिश काळात या रथयात्रेला बंदी घालण्यात आली होती. मात्र, १९२९ साली शेकडो महिलांनी ही बंदी झुगारून रथयात्रा काढली आणि तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. यंदाही ही परंपरा जपली गेली आणि संपूर्ण शहर भक्तीमय वातावरणात न्हालं.

या रथयात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रथ ओढण्यापूर्वी पोलिसांकडून सन्मानपूर्वक आणलेला भगवा ध्वज रथावर विराजमान केला जातो. यंदा पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या हस्ते हा ध्वज रथावर स्थापित करण्यात आला. त्यानंतर “बलभीम हनुमान की जय” च्या जयघोषात महिलांनी भक्तिभावाने रथ ओढण्यास सुरुवात केली.

रथयात्रा श्रीराम मंदिर, चंद्रशेखर चौक येथून सुरू होऊन रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, साळी वाडा, शास्त्री चौक, माळीवाडी, चावडी, बाजारपेठ मार्गे नेहरू चौक ते पुन्हा श्रीराम मंदिरापर्यंत पार पडली.

या रथ यात्रेत हजारो महिलांनी सहभागी होत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान मिळवला. सौ. नीलम खताळ यांनी इतर महिलांसह श्रद्धेने, भक्तिभावाने आणि उत्साहाने रथ ओढत स्त्रीशक्तीचे प्रतीक ठरले. या मिरवणुकीत आमदार अमोल खताळ आणि सौ. नीलम खताळ यांनीही सहभाग घेऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

धर्म, परंपरा आणि स्त्रीशक्ती यांचे अद्वितीय दर्शन या दिवशी संगमनेरकरांना अनुभवता आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here