संगमनेर – शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांवर संगमनेर नगरपरिषदेच्या अन्यायकारक शास्तीकराचा मोठा भार टाकण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, त्यांना दिलासा मिळावा यासाठी आमदार अमोल खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट पाठपुरावा केला आहे.
शहरातील अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली असून, गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर शास्तीकर वसूल केला जात आहे. सन २०११ पासून विनापरवाना बांधकामांवर दुप्पट दराने शास्ती आकारली जात असून, नागरिकांची मोठी पिळवणूक होत आहे.
या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्यासाठी शासनाने विशेष समिती स्थापन केली असून, संगमनेर नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरीकांना यातून दिलासा मिळावा यासाठी योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच बैठक
संगमनेर नगरपरिषदेच्या अन्यायकारक शास्तीकर वसुली प्रक्रियेविरोधात आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, लवकरच यासंदर्भात बैठक घेऊन योग्य निर्णय जाहीर केला जाणार आहे.
“संगमनेरकरांना अन्यायकारक शास्तीकरातून दिलासा मिळावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार असून, यात नागरीकांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.” – आ. अमोल खताळ
संगमनेरकरांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळण्याची शक्यता असून, आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.








