संगमनेरच्या प्रश्नांवर आ. खताळ यांची अधिवेशनात सरकारकडे मागणी

0
107

संगमनेर : मुंबई येथे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आमदार खताळ यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांवर राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी, अशी मागणी आमदार खताळ यांनी केली आहे.

संगमनेर मतदारसंघात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. मात्र, शासनाने घालून दिलेल्या किचकट अटींमुळे मंजुरीसाठी सात-आठ दिवस लागतात. त्यामुळे शासनाने टँकर मंजुरीसाठीच्या सर्व अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी केली.

संगमनेर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने संगमनेरला MIDC स्थापन करावी. तसेच संगमनेर तालुक्यातील पेमगिरी (शहागड) किल्ल्‌यावर जिजामाता यांचे वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तसेच किल्ल्याच्या विकासासाठी निधी मिळावा. तामकडा रोपवे आणि सौंदर्यकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. राज्य शासनाकडून सध्या पाच कोटींचा आमदार निधी मिळत आहे. परंतु एवढचा कमी निधीमध्ये विकासकामे करणे अवघड आहे. त्यामुळे राज्य शासनाने हा आमदार निधी ५ कोटींवरून १० कोटी रुपये करावा, अशी मागणी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सभागृहात केली.

ग्रामीण रस्ते विकास तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ५० कि.मी. रस्ते वाढविण्यात यावे. ऊर्जा विभागातील महत्त्वाच्या योजना RDSSS तसेच इतर योजनांसाठी निधी मिळावा. संगमनेर व अकोलेसाठी संगमनेर येथे सहकार न्यायालय सुरू करावे. संगमनेर शहरातील पोलीस वसाहतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पोलिस कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी चांगली वसाहत उभी राहणे आवश्यक आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. या महत्त्वाच्या प्रश्नांवर आमदार खताळ यांनी सरकारचे लक्ष वेधले.







LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here