आ. खताळ यांची माहिती; जिल्ह्याला ४३ कोटी मंजूर
संगमनेर : पर्यटन विकास योजनेतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून ४३ कोटी ६ लाख मंजूर झाले आहे. तसेच संगमनेर विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दिघे, साकुर, अंभोरे आणि धांदरफळ खुर्द या गावांचा तीर्थक्षेत्र विकासात समावेश करण्यात आला आहे. या परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून २ कोटी ८३ लाख ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील विविध मंदिरांचा तीर्थक्षेत्र विकासात सहभाग व्हावा आणि या भागातील पर्यटन विकासाला चालना मिळावी, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी पर्यटन विकासमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती. पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने प्रादेशिक पर्यटन योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पर्यटन विकासमंत्री शंभूराजे देसाई आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बिरोबा मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी २ कोटी, साकुर येथील वीरभद्र मंदिर देवस्थान परिसर शिवशोभीकरणासाठी ५० लाख, अंभोरे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी १४ लाख ६ हजार तर धांदरफळ खुर्द येथील बिरोबा मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी १९ लाख ३९ हजार असे ४ मंदिराच्या परिसर सोशोभीकरणासाठी २ कोटी ८३ लाख ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून वरील गावातील मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यातून या भागातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे आणि त्यातून स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यातूनच पर्यटन विकासाला गती मिळण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विकास विभागाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पर्यटन विकासमंत्री शंभूराज देसाई आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील या ४ गावातील मंदिरांच्या विकासासाठी निधी मंजूर झाला आहे. त्या निधीतून या परिसराचा विकास होऊन कायापालट होणार आहे. तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लागून या परिसराचा कायापालट होईल आणि पर्यटकांना सुख सुविधा उपलब्ध होऊन या मंदिर परिसराकडे, पर्यटकांचे आकर्षण वाढेल.
-आ. अमोल खताळ सदस्य, संगमनेर विधानसभा.








