संगमनेरमध्ये शिवजयंती मिरवणुकीचा जल्लोष; शहर झाले शिवमय!

0
213

संगमनेर : सकल हिंदू समाज आणि शिवसेना महायुती संगमनेर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, भगवे ध्वज फडकवत, शिवरायांचा जयघोष करत आणि पारंपरिक पोशाख परिधान करून हजारो शिवभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले.

शिवजयंती मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाआरतीने झाली. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. संपूर्ण संगमनेर शिवमय झाले होते. मिरवणुकीत शिवकालीन मर्दानी खेळ, अघोरी नृत्य, आदिवासी नृत्य, भव्या झांज पथके, सनई-चौघडे, ढोल-ताशा आणि बाल वारकऱ्यांच्या कीर्तनाने वातावरण अधिक भक्तिमय झाले.

प्रत्येक पथकाने आपल्या कलेतून शिवचरित्र सादर केले. ऐतिहासिक पोशाख परिधान करून युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे आणि विविध ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण केले. महिलांचा उत्स्फूर्त सहभागही लक्षणीय होता. पारंपरिक नऊवारी साड्या परिधान करून भगव्या पताका हाती घेत अनेक महिला या मिरवणुकीत सहभागी झाल्या.

शिवरायांचा पराक्रम, हिंदू संस्कृतीचा अभिमान आणि इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण शहरात शिवगर्जना होत असताना उत्साह ओसंडून वाहत होता.

“संगमनेरकरांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा मिरवणुका महत्त्वाच्या आहेत,” असे मत आमदार अमोल खताळ पाटील यांनी व्यक्त केले.

शिवभक्तांच्या अभूतपूर्व सहभागामुळे संगमनेर शहरात शिवजयंती सोहळा दैदिप्यमान आणि ऐतिहासिक ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here