२८ ऑगस्ट ‘हिंदवी स्वराज्य संकल्प दिन’ घोषित करा; आमदार खताळ यांची विधानसभेत जोरदार मागणी

0
38

संगमनेर/ प्रतिनिधी
मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ ऑगस्ट हा दिवस “हिंदवी स्वराज्य संकल्प दिन” म्हणून अधिकृतपणे साजरा करण्यात यावा, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत मांडली. या मागणीद्वारे त्यांनी सभागृहाचे तसेच राज्य सरकारचे लक्ष संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक वारशाकडे वेधले.

संगमनेर मतदारसंघातील पेमगिरी येथील शहागड हा सातवाहनकालीन संदर्भ असलेला तसेच स्वराज्यसंकल्पक शहाजीराजेंच्या कार्यकाळाशी निगडित असलेला अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक दुर्ग मानला जातो. इतिहासातील उल्लेखानुसार २८ ऑगस्ट १६३३ रोजी याच शहागडावरून शहाजीराजेंनी “हिंदवी स्वराज्याचा” संकल्प जाहीर केला होता. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद मानला जातो. या पार्श्वभूमीवर २८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर “हिंदवी स्वराज्य संकल्प दिन” म्हणून अधिकृतपणे साजरा करण्यात यावा, अशी ठाम मागणी आमदार खताळ यांनी केली.

याचबरोबर पेमगिरी येथील शहागडाच्या संवर्धनाचा मुद्दाही त्यांनी विधानसभेत उपस्थित केला. सध्या या ऐतिहासिक दुर्गाचे पुरेसे जतन व संवर्धन होत नसल्याने हा अमूल्य वारसा दुर्लक्षित अवस्थेत आहे. योग्य नियोजन आणि संवर्धन न झाल्यास या ऐतिहासिक ठेव्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. शहागडाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने दीर्घकालीन विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी करताना पुरातत्व, सांस्कृतिक आणि पर्यटन विभागांनी समन्वय साधावा, असेही त्यांनी सुचविले. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्याचे संवर्धन करण्यात यावे तसेच पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा विकसित करून या स्थळाला ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, असेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण होईल तसेच पर्यटन वाढून परिसराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या इतिहासाची आणि स्वराज्याच्या प्रेरणेची ही पवित्र भूमी जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत सरकारने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here