तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरणाचा शुभारंभ
संगमनेर/प्रतिनिधी
पोलिओपासून ते विविध आजारांवर मात करण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. एचपीव्ही ही लस यापूर्वी खाजगी स्तरावर उपलब्ध होती; मात्र महायुती सरकारने आता ही लस मुलींसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे. कुठल्याही अफवांना बळी न पडता मुलींनी एचपीव्हीचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राज्यशासनाच्या वतीने सुरू केलेल्या मुलींसाठीच्या मोफत एचपीव्ही लसीकरणाचा शुभारंभ सौ. नीलम खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश माने, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, उपसरपंच मयूर दिघे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे, शिवाजी आहेर, नंदकुमार देशपांडे, राजेंद्र आहेर, उत्तम दिघे, अमोल दिघे नवनाथ राऊत, कचरू वारूंक्षे, रवींद्र दिघे सुवर्णा दिघे, निखिल सानप आदीसह आरोग्यसेविका आणि आशा सेविका उपस्थित होत्या.

सौ. खताळ म्हणाल्या की, आजच्या मुलीच उद्याचे भविष्य आहेत. मुली व महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याने त्यापासून संरक्षण मिळावे यासाठी एचपीव्ही लस महत्त्वाची आहे. काहीजण अफवा पसरवून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या अफवांना बळी न पडता मुलींनी ही लस घेणे आवश्यक आहे. एचपीव्ही लसीसह इतरही लसीबाबत आशा सेविका व आरोग्य सेविकांनी प्रत्येक घराघरात जाऊन लसीकरणाचे महत्त्व महिलांना पटवून द्यावे. मुलींसाठीच नव्हे तर मुलांसाठी ही विविध आजारांपासून संरक्षण देणाऱ्या लसी उपलब्ध आहेत, आणि त्या लसीकरणाचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. आशा सेविकांच्या काही अडचणी असल्यास त्यापण मला सांगाव्यात, आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून त्या सोडविण्या साठी आपण प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित; बदलीची मागणी….
तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हा शासकीय कार्यक्रम असताना सुद्धा तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डामसे अनुपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांच्या विषयी सौ नीलम खताळ यांच्या समोर तक्रारी केल्या डॉ डामसे हे कधीच प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करण्यासाठी थांबत नाहीत. त्यामुळे त्यांची बदली करून या प्राथमिक आरोग्य केंद्रा साठी दुसरे वैद्यकीय अधिकारी द्यावे आणि त्यांच्या बदलीचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशी सूचना त्यांनी प्रभारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना केली.
राज्य शासनाच्या वतीने मुलींसाठी मोफत एचपीव्ही लस देत आहे. या लसीबाबत काही अफवा पसरवल्या जात असून मुलींच्या आई वडिलांनी या कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्व मुलींनी लसीकरण करून घ्यावे.
डॉ. निलेश माने (प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी)








