संगमनेर | प्रतिनिधी
आमदार-खासदार एखाद्या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले की त्यांच्यासाठी खास व्यवस्था केली जाते, गर्दी असतानाही त्यांना तात्काळ दर्शन मिळते अशीच सर्वसाधारण धारणा आहे. मात्र संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी आपल्या साधेपणाने ही धारणा खोटी ठरवत भाविकांची मने जिंकली आहेत.
गुरुवारी (दि. २२) गणेश जयंतीच्या पावन दिवशी शहरातील महावितरण कार्यालयाच्या आवारातील प्रसिद्ध शमी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आमदार खताळ आले होते. विशेष म्हणजे दर्शनासाठी मोठी गर्दी असतानाही त्यांनी कोणताही विशेष मान-सन्मान न घेता, इतर भाविकांप्रमाणेच रांगेत उभे राहून शांतपणे श्री शमी गणपतीचे दर्शन घेतले. महावितरण कार्यालयाच्या आवारातील शमी गणपती मंदिरात दररोज भाविकांची मोठी गर्दी असते. गणेश जयंतीनिमित्त सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आमदार अमोल खताळ दर्शनासाठी आले. त्यांनी कुठलीही दर्शन रांग थांबवली नाही, कुठलाही विशेष आग्रह धरला नाही; थेट रांगेत उभे राहून सर्वसामान्य भाविकांप्रमाणे दर्शन घेतले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित भाविकांमध्ये सकारात्मक चर्चा रंगली आणि सर्वत्र त्यांच्या साधेपणाचे कौतुक झाले. दर्शनानंतर देवस्थानच्या अध्यक्षांच्या हस्ते आमदार खताळ यांचा सन्मान करण्यात आला. जनतेशी थेट संवाद आणि सर्वसामान्यांशी नाते जपणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ होत असल्याचे यावेळी दिसून आले.
जनसंपर्क कार्यालयातही आ.खताळांचा साधेपणा…
आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात दररोज गावोगाव तसेच वाड्या-वस्त्यांवरील महिला-पुरुष विविध कामांसाठी येत असतात. या कार्यालयाचा दरवाजा सर्वसामान्यांसाठी नेहमीच खुला असतो. कोणतीही अडथळे किंवा औपचारिकता न ठेवता नागरिक थेट आमदारांची भेट घेतात. आलेल्या प्रत्येकाच्या अडचणी ऐकून घेऊन त्या प्राधान्याने मार्गी लावण्यावर आमदार खताळ भर देतात. हाच साधेपणा, सहज उपलब्धता आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे गावोगावच्या नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत विश्वास निर्माण झाला असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.








