क्रिकेट स्पर्धेतून स्व. शेखर शेळके यांच्या स्मृती जिवंत : आ. अमोल खताळ

0
32

घारगाव येथे क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

संगमनेर / प्रतिनिधी
बोटा येथील स्व. शेखर शेळके या तरुणाने अनेक वर्षे क्रिकेट स्पर्धा भरविण्यात सातत्याने पुढाकार घेतला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा भरवून त्यांच्या स्मृती जपण्याचे काम शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर यांनी केले असून, त्यांच्या नावाने या क्रिकेट स्पर्धेचा चषक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.

घारगाव( ता.संगमनेर) येथे स्व. म्हातारबा लक्ष्मण आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती क्रिकेट क्लब, घारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शेखर शेळके चषक २०२६ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ व स्व. शेखर शेळके यांच्या मातोश्री नंदा शेळके यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहणे, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर, सरपंच नितीन आहेर, उपसरपंच रेश्मा धात्रक, चंद्रकांत घुले, संतोष शेळके, सुहास वाळुंज, रमेश आहेर, सर्जेराव ढमढेरे, सुरेश गाडेकर, हारून शेख यांच्यासह पठार भागातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून पठार भागातील तरुणांना एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम जनार्दन आहेर यांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे, तरुणांना सकारात्मक दिशेने नेणे आणि खेळातून नेतृत्व घडवणे ही त्यांची भूमिका कायम राहिली आहे. स्व. शेखर शेळके यांना जाऊन बरेच दिवस झाले असले तरी क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचे नाव आजही जिवंत ठेवण्याचे काम आहेर करीत आहेत.

पठार भागाच्या विकासासाठी आहेर यांनी फार मोठा संघर्ष केला असून आजही या भागाच्या प्रगतीसाठी त्यांची सतत तळमळ असते. स्व. शेखर शेळके यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धा भविष्यातही सातत्याने सुरू राहतील आणि त्यांच्या स्मृतींना खऱ्या अर्थाने उजाळा देण्याचे कार्य या माध्यमातून होईल, असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक हारून शेख यांनी केले तर जनार्दन आहेर यांनी आभार मानले.


पूर्वीच्या काळी क्रिकेट स्पर्धा क्वचितच भरविल्या जात होत्या. मात्र जनार्दन आहेर यांनी पठार भागात दरवर्षी नियमितपणे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन सुरू ठेवले आहे. संगमनेर तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर प्रत्येक गावात आमदार व नामदार चषक क्रिकेट स्पर्धा भरविल्या जात आहेत.
— अमोल खताळ (आमदार, संगमनेर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here