रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द रस्ता होणार प्रकाशमय

0
48

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

संगमनेर/ प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द दरम्यान असलेल्या जुन्या नाशिक–पुणे रस्त्यावर अखेर प्रकाश पडणार असून, आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या मार्गावरील १०८ पथदिवे व ४ हायमॅक्स दिव्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दररोज हजारो वाहनांची ये-जा असलेल्या या महत्त्वाच्या मार्गावर लवकरच प्रकाश व्यवस्था सुरू होणार असल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे-नाशिक रस्त्याचे दुहेरीकरण झाले असले तरी त्यानंतर अपेक्षित असलेली पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली नव्हती. परिणामी रात्रीच्यावेळी वाहन चालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. वेगवान वाहतूक, अवजड वाहनांची सततची ये-जा, अचानक समोर येणारे दुचाकीस्वार किंवा पादचारी यांमुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला होता. अनेक वेळा अपघाताच्या घटना घडलेल्या आहे त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ही गंभीर बाब संगमनेर खुर्द येथील शिवसेना महायुतीचे निलेश गुंजाळ,सचिन पावबाके, संकेत खुळे महेश सातपुते, ऍड भाऊसाहेब गुंजाळ संतोष शिंदे, जग्गू शिंदे, विकास कोल्हे, ओंकार गुरुकुले, अमोल गुंजाळ, ईश्वर मांडेकर, सोनल गुंजाळ, अभिषेक गुंजाळ, योगेश नवले, दत्ता खुळे, महेश मांडेकर, यांनी आ. अमोल खताळ यांच्या लक्षात आणून देत या विषयाकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली. आमदार खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ठेकेदाराकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द या संपूर्ण मार्गावर १०८ पथदिवे उभारण्यात आले आहेत. यासोबतच महत्त्वाच्या चौक व वळणांवर ४ उच्च क्षमतेचे हायमॅक्स दिवेही बसवण्यात आले आहेत.

याबाबत प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे म्हणाले की सध्या या पथदिव्यांचे वायरिंगचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या काही दिवसांत सर्व पथदिवे आणि हायमॅक्स दिवे सुरू होणार आहेत. हे दिवे कार्यान्वित झाल्यानंतर संपूर्ण रस्ता उजेडाने न्हाऊन निघणार असून, रात्रीच्या वेळी प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि अपघातमुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे. दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या मार्गावर प्रकाशव्यवस्था सुरू झाल्याने वाहनचालक, व्यापारी, शेतकरी तसेच परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आमदार खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर न्याय मिळाल्याची भावना शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here