आमदार खताळांच्या पाठपुराव्याने रस्ते, पाणी, एमआयडीसीला गती; शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ
संगमनेर : महायुती सरकाराच्या माध्यमातून कोट्यावधींचा विकासनिधी आणून ४० वर्षांपासून रखडलेली विकास कामे आमदार अमोल खताळ मार्गी लावत आहेत. हे माजी आमदारांच्या बगलबच्च्यांना बघवत नसून वर्षभरातच संगमनेर तालुक्याला मिळालेल्या तब्बल ८४९ कोटी रुपयांच्या निधीमुळे त्यांचा जळफळाट होत आहे. त्यामुळेच तालुक्याला मिळालेल्या निधीवर टीका करण्याची वेळ विरोधकांवर आली असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष गुलाब भोसले यांनी म्हटले आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व १७१ गावे २५८ वाड्या-वस्त्यांवरील तळागाळातील सर्व नागरिकांपर्यंत महायुती सरकाराच्या योजना आणि त्यांचा लाभ पोहोचवण्याचे काम आ. अमोल खताळ यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू आहे. महायुती सरकारमुळेच तालुक्यात विकासाची पायाभरणी होत असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.
आमदार खताळ यांच्या पाठपुराव्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील बॅकलॉग भरून काढण्याचे काम सुरू असल्याचे सांगत भोसले म्हणाले की, गावागावातील रस्त्यांच्या समस्यांची जाणीव शेतकरी आणि नागरिकांना आहे. शेत पाणंद रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामाचे भिजत घोंगडे कोणी ठेवले? हे जनतेला चांगलेच माहित आहे. आज त्यातील अनेक कामांना निधी मंजूर होऊन सुरुवात झाली आहे. राजकीय स्वार्थापोटी पाण्यासाठी शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्याचे पाप संगमनेरच्या माजी आमदारांनी केले. यापुर्वी तालुक्यातील जनतेच्या आशिर्वादाने मंत्रीपदे भोगणाऱ्या आणि त्यांचे स्थानिक नेते असलेल्या ठेकेदारांना शेतकर्यांच्या दुःखाची जाणीव कधी झालीच नाही. मात्र तालुक्यात महायुतीचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अमोल खताळ निवडून आल्यानंतर जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात आणि प्रत्येक शेतकर्याला पाणी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यादृष्टीने भोजापूर पूर चारीचे काम करून पाणी तिगाव माथा पर्यंत पोहोचले. निळवंडेच्या डावा आणि उजव्या कालव्याचे पाणी प्रत्येक शेतकर्याला देण्यासाठी प्रक्रिया सुरू असून त्यासाठी जलसंपदा विभागामार्फत निधी मंजूर करण्यात आला आहे.
माजी आमदारांच्या काळात पाण्यावाचून दुष्काळी पट्टा म्हणून ओळख बनलेल्या साकुर पठार भागाला १ वर्षापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शब्द दिल्याप्रमाणे या भागातील ६ उपसा सिंचन योजना जलसंपदा विभागास हस्तांतरित करून त्यांचे एकत्रित उपसा सिंचन योजना व को.प. बंधारे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या कामाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. निधी मिळून शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न आता मार्गी लागत आहे. याचीच पोटदुखी बगलबच्च्यांना आणि त्यांच्या आकाला झाली आहे.
आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून नागरिकांना महायुती सरकाराच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यात मोठे यश मिळाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने एमआयडीसीची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. मात्र ‘एमआयडीसीसाठी चाळीस वर्ष न जमलेला पाठपुरावा आता आम्ही पण केला’ असे सांगण्याची हास्यास्पद वेळ मामा-भाचे जोडीवर आली आहे.
आमदार अमोल खताळ यांच्या कामाचा धडका पाहून बिथरलेल्या मामा-भाचे टोळीला तालुक्यामध्ये विविध योजना आणि जनतेच्या विकासकामांसाठी आलेल्या निधीवर टीका करणे शोभणारे नाही. मागील काळात कामे अपूर्ण ठेवून आपल्यामुळे संगमनेर तालुक्यातील जनतेला त्रास सहन करावा लागला, याचे आत्मचिंतन व प्रायश्चित्त करण्याची गरज विरोधकांना असल्याचा सल्ला संगमनेर भाजपाचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले यांनी दिला.








