संगमनेरकरांचा मनातील जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध करणार – आमदार खताळ

0
29

संगमनेर : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ‘संगमनेरकरांचा मनातील जाहीरनामा’ लवकरच पत्रकार परिषदेत जाहीर करणार असून, या जाहीरनाम्याच्या माध्यमातून शहराच्या प्राधान्यक्रमानुसार ठोस विकास आराखडा सादर केला जाईल, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली

शहरातील विविध भागांमध्ये दौरा करताना आमदार खताळ म्हणाले की, आम्ही नेहमीच मतदारांचा सन्मान करतो, परंतु विरोधकांना मतदारांचा सन्मान करण्याची खरी भावना नाही. बिहार निवडणुकीतील निकालाने त्यांना मतदारांनी स्पष्ट संदेश दिला आहे. वर्षानुवर्षे सत्ता हातात असूनही साधे मूलभूत प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. महायुतीच्या सरकारबाबत विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि जिल्हात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. महायुती म्हणून आम्हीच या निवडणुकीला सामोरे जात असून, मतदारांनी विकासाच्या प्रवाहात सामील व्हावे.

शहरातील विकासाच्या दृष्टीने भूतकाळातील दुर्लक्षाचा उल्लेख करत आमदार खताळ म्हणाले की, चाळीस वर्षे सत्तेवर असताना या लोकांना शहराचा विकास करता आला नाही. आणि आता पुन्हा विकासाचे आश्वासन देत आहेत. प्रत्यक्षात त्यांनी आजवर मतदारांची दिशाभूलच केली आहे. आगामी घोषणापत्रात शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठा सुधारणा, रस्ते-विकास, वाहतूक नियोजन, आरोग्य सुविधा, क्रीडासंकुल, तंत्रज्ञानाधारित नागरी सुविधा, तसेच तरुणांसाठी रोजगारनिर्मिती अशा अनेक प्राधान्याच्या मुद्द्यांचा समावेश असणार आहे. आमदार अमोल खताळ यांनी नागरिकांना आवाहन केले की, “संगमनेरचा विकास महायुतीच करू शकते. मतदारांनी विकासाबरोबर उभे राहावे आणि दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांना बळी पडू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here