नागरी क्षेत्रांत तुकडेबंदी कायदा रद्द; महाराष्ट्रातील ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा

0
161

आ. अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

संगमनेर : नागरी भागात तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या जमीन व्यवहारांना नियमित करण्याच्या मागणीला अखेर मोठे यश मिळाले आहे. विधानसभेत आ. अमोल खताळ यांनी केलेल्या ठोस मागणीनंतर राज्य सरकारने तातडीने कार्यवाही सुरू केली असून तुकडेबंदीचे व्यवहार विनाशुल्क नियमित करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ३ कोटी लोकांना थेट दिलासा मिळणार असून संगमनेर तालुक्यातील नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

पूर्वी अनेकांनी तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून जमीन खरेदी-विक्री व्यवहार केले होते. मात्र हे व्यवहार कायद्याच्या कचाट्यात अडकत असल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक, कायदेशीर अडचणीत सापडत होते. हीच समस्या लक्षात घेऊन तत्काळीन महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयाची दिशा निश्चित केली होती. त्याच निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी विधानसभेत आ. अमोल खताळ यांनी प्रखरपणे मांडली होती.

ही मागणी मान्य करत सध्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत तुकडेबंदी रद्द करण्याची घोषणा केली होती. आता महसूल विभागाने यासंदर्भातील प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली आहे.

सर्वसामान्य माणसाच्या डोक्यावरून मोठा भार उतरला – आ. अमोल खताळ

“हा निर्णय म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या डोक्यावरून मोठा भार उतरल्यासारखे आहे. महायुती सरकार हे खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातील सरकार आहे. तुकडेबंदी व्यवहार नियमित करण्याच्या या निर्णयामुळे ग्रामीण-शहरी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे,” अशी प्रतिक्रिया आ. अमोल खताळ यांनी दिली.
आ. खताळ यांनी पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि या निर्णयासाठी सातत्याने प्रयत्न करणारे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.
“सर्वसामान्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचे महायुती सरकारचे धोरण पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे,” असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here