मुंबई : आगामी निवडणुकीत मतचोर, दुबार मतदार जिथे दिसेल तिथे त्याला फटकविण्याचे काम करा, असे आवाहन उद्धव आणि राज या दोन ठाकरे बंधुंनी महाविकास आघाडी व मनसेतर्फे मतदार याद्यांमधील घोळाच्या निषेधार्थ काढलेल्या भव्य ‘सत्याच्या मोर्चा’ समोर शनिवारी केले. ‘आपली विचारधारा वेगळी असेल पण संसदीय लोकशाही व जनतेचा मताधिकार टिकवण्यासाठी एकजूट ठेवा’ अशी साद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घातली. ‘आधी मतदारयाद्या दुरुस्त करा अन् मगच निवडणुका घ्या’ अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
राज ठाकरे यांचे लोकलने मोर्चाला पोहोचणे, मोर्चाआधी उद्धव ठाकरेंशी त्यांनी केलेली चर्चा, मोर्चातील सहभागाविषयीची शंका दूर करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेला सहभाग, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते, समर्थकांचा उत्साही सहभाग यामुळे मोर्चा लक्षणीय ठरला. आझाद मैदानासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मतचोरी, दुबार मतदारांची मोठी संख्या या मुद्यांवरून ठाकरे बंधू, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग तसेच केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. काँग्रेसचे विधानसभेतील नेते विजय वडेट्टीवार, शेकापचे जयंत पाटील, भाकप, माकपसह अन्य विरोधी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते.
मतचोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकवायला पाहिजे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही, पण कायद्याचा खोटा दांडूका आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचे काय करायचे हा निर्णय घ्यायला जनता सक्षम आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
तसेच राज ठाकरे म्हणाले की घराघरात जा, याद्यांवर काम करा, चेहेरे कळले पाहिजेत, चेहरे तपासा, त्यानंतर जर तिकडे दुबार-तिबार वाले आले, तिथेच फोडून काढायचे, बडवायचे आणि मग पोलीसांच्या हातात द्यायचे, त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत.
विधानसभेची बोगस, दुबार नावे असलेली मतदार यादीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वापरली जाणार आहे. तसे होऊ नये. आधी याद्या दुरुस्त करा. मगच निवडणूक घ्या. आम्ही आयोगाला पुरावे दिले पण आयोगाने उत्तर दिलेले नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी मोर्चात सांगितले.








