भाऊबहिणींच्या नात्याचा सण आमदार अमोल खताळ यांच्या निवासस्थानी साजरा
संगमनेर : आमदार अमोल खताळ पाटील यांच्या निवासस्थानी भाऊबीज सण अत्यंत आनंद, उत्साह आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी आमदार खताळ यांच्या बहिणींनी पारंपरिक पद्धतीने आपल्या भावाचे औक्षण करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मंगल प्रार्थना केली.
या प्रसंगी आमदार अमोल खताळ पाटील यांच्यासह वडील धोंडीबा खताळ आणि बंधू राहुल खताळ यांचेही बहिणींनी औक्षण करून प्रेमळ शुभेच्छा दिल्या. पारंपरिक आरती, फुलांच्या सजावटीने आणि गोड पदार्थांच्या सुगंधाने घरभर सणासुदीची उत्साह पाहायला मिळाला. भाऊबहिणींच्या जिव्हाळ्याचे, स्नेहाचे आणि आपुलकीचे क्षण उपस्थित सर्वांच्या मनात आनंदाचा ठेवा बनले.
भाऊबीजचे महत्त्व सांगताना आमदार अमोल खताळ म्हणाले, “आपल्या संस्कृतीत नाती जपण्याची परंपरा हीच आपली खरी ताकद आहे. भाऊ-बहीण यांचं नातं हे केवळ रक्ताचं नसून भावना, विश्वास आणि आपुलकीने घट्ट बनलेला एक बंध आहे. सर्व भावंडांच्या नात्यातील हा प्रेमाचा धागा सदैव मजबूत राहावा, हीच माझी मनापासून प्रार्थना आहे.
भाऊबीजसह दिवाळीचा हा सण संपूर्ण संगमनेर तालुक्यात आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण करणारा ठरला आहे. प्रत्येक घरात दिव्यांची रोषणाई, गावागावांमध्ये आणि व्यापारी पेठांमध्ये दिवाळीचा उत्साह दिसत आहे. लहान-थोरांपासून सर्वजण एकत्र आल्याने संगमनेर तालुक्यासह संपूर्ण भागात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.








