अहिल्यानगर जिल्ह्यात राज्यातील पहिले सहकार विद्यापीठ स्थापन करावे

0
51

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे आमदार अमोल खताळ यांनी केली मागणी

संगमनेर : गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या गुजरात सहकार विद्यापीठाच्या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राच्या विकासासाठी राज्यातील पहिले सहकार विद्यापीठ अहिल्यानगर जिल्ह्यात स्थापन करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी  लोणी येथे कार्यक्रमासाठी सहकार मंत्री अमित शहा आले असता त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात साखर, दूध, बँकिंग आणि कृषी क्षेत्रातील सहकारी संस्था प्रभावीपणे कार्यरत आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्राच्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक उन्नतीसाठी महाराष्ट्रातही असे विद्यापीठ स्थापन होणे गरजेचे आहे असे आ. खताळ यांनी केंद्रीय सहकार मंत्री शहा यांना दिलेल्या निवेदना मधून स्पष्ट केले आहे.

या प्रमुख मागणी बरोबर  संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आणखी काही महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सहकार मंत्री अमित शहा यांना दिले. त्यामध्ये नाशिक-पुणे रेल्वेमार्ग संगमनेर मार्गे नेण्याची मागणी करण्यात आली आहे. हा रेल्वे प्रकल्प औद्योगिक, कृषी आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून सध्याच्या आराखड्यात संगमनेर शहराचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र संगमनेर हे भौगोलिक व आर्थिक दृष्ट्या या मार्गावरील महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार खताळ यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

तसेच नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्ग (NH-60) सहा पदरी करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. या महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची व मालवाहतूक ट्रकांची वर्दळ असते. सध्या या मार्गाच्या बहुतांश भागामध्ये केवळ दोन किंवा चार लेन असल्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात, विलंब व प्रवासात अडचणी अशा अनेक समस्या निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

संगमनेर तालुका भौगोलिक दृष्ट्या नाशिक-पुणे-मुंबई या महत्त्वाच्या मार्गावर स्थित असून फळे, भाजीपाला व दुग्ध उत्पादनासाठी हे क्षेत्र ओळखले जाते. येथील कृषी उत्पादनांचे आधुनिकीकरण, प्रक्रिया उद्योग आणि उत्पादने मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी संगमनेर येथे कृषी हब म्हणून विकसित करण्याची मागणी आमदार खताळ यांनी गृहमंत्री शहा यांच्याकडे केली आहे.

संगमनेर तालुका व परिसरात असंघटित आणि संघटित क्षेत्रातील सुमारे ६,००० कामगार कार्यरत आहेत. औद्योगिक व कृषी आधारित उपक्रमांमुळे कामगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने संगमनेरमध्ये स्वतंत्र कामगार रुग्णालयाची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील वाढत्या कामगार संख्येचा विचार करून येथे केंद्र सरकारच्या अधीन कामगार रुग्णालय स्थापन करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. आमदार अमोल खताळ यांच्या या पुढाकारामुळे संगमनेर तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा विकासाच्या नव्या टप्प्यावर वेगाने आगेकूच करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मागण्यांचा पूर्ण झाल्यास संगमनेरसह अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळेल – अमोल खताळ

या सर्व मागण्याबाबत केंद्रीय सहकार आणि गृह मंत्री अमित शाह यांनी  सकारात्मक प्रतिसाद देत, पुढील पातळीवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या सर्व मागण्यांचा मी वेळोवेळी पाठपुरावा करणार असून त्या पूर्ण झाल्यास संगमनेर तालुका तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here