लागा तयारीला! संगमनेर नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, 15 प्रभागातून 30 नगरसेवक

0
261

संगमनेर : नगर परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना अखेर जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग रचनेवर नागरिकांनी नोंदवलेल्या ३३ हरकतींवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, त्यात बदल करून ही अंतिम रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यासंदर्भात प्रभारी मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी ही माहिती दिली आहे. याआधी १५ प्रभागांची रचना जाहीर झाली होती. मात्र संभाव्य इच्छुक उमेदवारांसह नागरिकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एकूण ३३ हरकती नोंदवल्या गेल्या. यामध्ये प्रभाग क्र. २ मध्ये १७ आणि प्रभाग क्र. ९ मध्ये ५ हरकती होत्या. तसेच, उर्वरित हरकती प्रभाग क्र. ७, ९, १२, १४ आणि १५ मध्ये होत्या.

पालिकेतील अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. यानंतर आता शहरातील एकूण १५ प्रभागांची रचना अंतिम करण्यात आली असून, प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक (एक महिला आणि एक पुरुष) असणार आहेत. त्यानुसार, एकूण ३० नगरसेवकांसाठी ही निवडणूक होणार आहे.

यामुळे आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या हालचालींना गती मिळाली असून, निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इच्छुकांनी त्या दृष्टीने आपल्या परीने आता प्रयत्न सुरू करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या निवडणूक विभागाचे अधिकारी सध्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी तयार करण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here