संगमनेर : तालुक्यातील पठार भागात एका 26 वर्षीय विवाहित आदिवासी महिलेवर दोन जणांनी मिळून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश प्रजापती (रा. घारगाव, ता. संगमनेर) याने पीडितेला आपल्या घरी साफसफाईच्या कामाच्या बहाण्याने बोलावून घेतले व तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर त्याने शेजारी बेकरी चालवणाऱ्या सैफुल्ला अबुतय्यब शेख (रा. नारायणगाव, जि. पुणे) याला देखील बोलावून घेतले. शेख यानेही विवाहितेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
१५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता ही घटना घडली. पीडिता आपल्या भावासोबत पाणीपुरी खाण्यासाठी प्रजापतीच्या दुकानावर गेली होती. तेव्हा त्याने तिला साफसफाईचे काम करण्यासाठी घरी बोलावले. घरात नेल्यानंतर त्याने जबरदस्ती केली आणि नंतर शेखलाही तिथे बोलावून अत्याचार घडवून आणला.
या घटनेबद्दल कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी देखील आरोपींनी दिली होती. या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींच्या शोधासाठी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या पथकांनी मोहीम हाती घेतली आहे.








