पिंपळे ग्रामस्थांचा संताप उफाळला; ३० सप्टेंबरपासून ग्रामपंचायतीसमोरच आमरण उपोषणाला सुरुवात

0
25

संगमनेर : पिंपळे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात मंगळवार, ३० सप्टेंबरपासून ग्रामस्थ आपल्या हक्कासाठी आमरण उपोषणास सुरुवात करणार आहेत. ग्रामपंचायतीकडून वारंवार झालेल्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ अखेर आक्रमक झाले आहेत. “हक्काची मागणी मान्य झालीच पाहिजे!” या निर्धाराने उपोषणकर्ते आण्णासाहेब गंगाधर चकोर व रमेश मनोहर ढोणे यांनी लढ्याचा इशारा दिला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे निवेदन दिले गेले, मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ एकवटले असून, मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या

१) गावातील सर्व स्टोन क्रशर कायमस्वरूपी बंद करावेत. क्रशरमुळे ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषण वाढून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. याचा थेट परिणाम शेतीमालावरही होत आहे.

२) जुन्या नोंदीप्रमाणे जमिनीचे रेकॉर्ड पुन्हा पूर्ववत करावे. गट नंबर ३२६/अ, ३२६/बी, ५५२/१, ५५३/२ हे रेकॉर्डवरील हक्कानुसार मिळावे, तसेच २१६२ व २१६३ हे फेररद्द करावेत.

३) अंगणवाडीतील मंजूर शौचालयाचे काम थांबले असून त्याबाबत खुलासा करावा.

४) जल जीवन मिशनांतर्गत मोफत जोडणी असूनसुद्धा ग्रामपंचायतीने घेतलेल्या डिपॉझिटचा हिशेब द्यावा.

५) अन्न सुरक्षा योजनेत हेतुपुरस्सर काही लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यामागील कारण स्पष्ट करावे.

६) प्रधानमंत्री आवास, माता रमाई घरकुल व शबरी घरकुल योजनेंतर्गत पात्र भूमिहीन, गोरगरीब लाभार्थ्यांना तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी.

ग्रामस्थांचा आरोप आहे की, गावातील ज्वलंत प्रश्न सोडविण्यात ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. दीर्घकाळापासून रखडलेल्या प्रश्नांकडे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने हा टोकाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सध्या पिंपळे गावात संताप आणि संघर्षाचे वातावरण असून ग्रामस्थांचा उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत आहे. येत्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here