संगमनेर : तालुक्यात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या बेकायदेशीर खाणकामावर महसूल विभागाने धडक कारवाई केली. नाशिक-पुणे महामार्गावरील गुंजाळवाडी परिसरात परवानगीशिवाय मुरूम उत्खनन करून डंपरमधून वाहतूक होत असल्याची माहिती खबरीमार्फत मिळताच महसूल विभागाने तत्काळ छापा टाकला.
या कारवाईत संगमनेरचे तलाठी पांडुरंग भुरे आणि गुंजाळवाडीचे तलाठी प्रवीण ढोले यांनी एम.एच. 19 सी.वाय. 3529 क्रमांकाच्या हायव्यासह चालकाला ताब्यात घेतले. चौकशीत हायवा मालक मनोहर सातपुते यांनी विनापरवाना 5 ब्रास मुरूम उत्खनन केले असल्याचे स्पष्ट झाले. महसूल विभागाने डंपर जप्त करून तो पोलिस लाईनमध्ये जमा केला आहे.
तहसीलदार धीरज मांजरे यांनी सांगितले की, सदर प्रकरणी नोटीस देऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई तहसीलदार मांजरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
दरम्यान, संगमनेर परिसरात मुरूम आणि रेतीची बेकायदेशीर वाहतूक दिवसेंदिवस वाढत असून, अनेकदा विना नंबर वाहने देखील आढळतात. महसूल विभागाने अशा प्रकारच्या कारवाया अधिक काटेकोरपणे करून अवैध खाणकामावर आळा घालण्याची मागणी होत आहे.








