अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश
संगमनेर : तालुक्यासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक अशी घोषणा करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग)” अंतर्गत हिवरगाव पावसा येथील श्री खंडोबा देवस्थानाला ‘ब वर्ग’ दर्जा प्रदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, या निर्णयामागे आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
खंडोबा महाराज हे संगमनेर तालुक्याचे आराध्य दैवत असून, दरवर्षी होणाऱ्या यात्रेत हजारो भाविक सहभागी होतात. या यात्रेमुळे परिसरात व्यापार, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. तथापि, भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांची उणीव दीर्घकाळ भासत होती. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी खंडोबा देवस्थानाला “ब वर्ग” दर्जा मिळावा यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन हा दर्जा मिळाल्याने देवस्थानाच्या विकासाची नवी दारे खुली झाली आहेत.
या निर्णयामुळे आता देवस्थान परिसरात स्वच्छता, पाणीपुरवठा, निवासव्यवस्था, रस्ते, प्रकाशयोजना, शौचालये यांसारख्या मूलभूत सोयी उपलब्ध होणार असून यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. धार्मिक पर्यटनाला चालना मिळाल्याने स्थानिक शेतकरी, व्यावसायिक आणि युवकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. देवस्थान परिसराचे सौंदर्यीकरण होऊन संगमनेर तालुका राज्यातील धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे उमटेल.
यावेळी काशिनाथ पावशे, केशव दवंगे, गणेश दवंगे, सोमनाथ दवंगे, गणेश पावसे, सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, खंडोबा देवस्थानचे माजी अध्यक्ष पावसे मोठ्या भाऊ बडे, देवस्थानचे सचिव मोठ्या भाऊ बडे, चंद्रशेखर गडाख, सुरेश पावशे, गोरक्षनाथ पावशे, यादवराव त्रिंबक पावसे, पांडुरंग नारायण गडाख, उत्तम लक्ष्मण जाधव, सोमनाथ भालेराव, मच्छिंद्र गडाख, किरण पावशे, सोमनाथ दगडू पावसे, सचिन सस्कर, भाऊसाहेब पावसे, बाळासाहेब पावसे, अशोक गोफणे, भारत गोफणे आदी मान्यवरांचा समावेश होता. या सर्वांनी मिळून देवस्थानाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न केले असून, आजचा दिवस त्यांच्या योगदानाचाही सन्मान करणारा आहे. असे आमदार अमोल खताळ यांनी यावेळी सांगितले.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, “खंडोबा महाराज हे आपल्या तालुक्याचे श्रद्धास्थान आहेत. देवस्थानाला मिळालेला हा दर्जा हा केवळ भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान नसून संगमनेर तालुक्याच्या विकासाचा नवा टप्पा आहे.यानिमित्ताने मी पालकमंत्री विखे पाटील साहेब, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब, राज्यमंत्री योगेशजी कदम साहेब यांचेही मी विशेष आभार मानतो.तसेच भाविकांची सोय, स्थानिकांची आर्थिक प्रगती आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेचे जतन यासाठी मी सातत्याने काम करत राहीन.”








