संगमनेरात फुटपाथवर धोकादायक स्टंटबाजी करणारे पोलिसांच्या ताब्यात; व्हीडिओ व्हायरल झाल्यावर कारवाई

0
32

संगमनेर : केवळ सोशल मीडियावर रील्स टाकून प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही तरुण आपले प्राण धोक्यात घालत आहेत. संगमनेर शहरातील पुणे-नाशिक महामार्गावरील 132 केव्ही समोरील फुटपाथवर दोन तरुणांनी दुचाकीवर जीवघेणा स्टंट केला. धोकादायक पद्धतीने वाहन चालवत त्यांनी केवळ स्वतःच जीव धोक्यात घातला नाही तर इतर नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण केला. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला. दोघाही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून केलेल्या कृतीबाबत माफीनामाही घेण्यात आला आहे.

शहर पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता ही घटना घडली. या तरुणांनी फुटपाथवर दुचाकी बेदरकारपणे चालवत स्टंटबाजी केली आणि अपघात होऊन स्वतः गंभीर जखमीही झाले. मात्र त्यांना जखमी अवस्थेतही सुबुद्धी आली नाही. उलट त्यांच्या मित्रानेच ही घटना मोबाईलमध्ये कैद करून रील्स सोशल मीडियावर व्हायरल केली.

नागरिकांनी या प्रकारावर संताप व्यक्त करून पोलिसांना कारवाईची मागणी केली. तपासाअंती पोलिसांनी व्हिडिओतील तरुणांची ओळख पटवून त्यांच्यावर मोटर वाहन कायद्याखाली गुन्हा दाखल केला. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या पालकांनाही बोलावून दिलगिरी व्यक्त करावी लागली. अखेर स्वतःची चूक कबूल करत दोघांनी माफीनामा दिला आहे.

सदर रील्स बघून नागरिकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून अशा तरूणांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. सुदैवाने या घटनेत अन्य कोणी जखमी झाले नाही.पोलिसांनी अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेनुसार कारवाई करुन ‘त्या’ तरुणांना धडा शिकवला.

-रवींद्र देशमुख, पोलिस निरीक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here