संगमनेर : बुधवारी रात्री शहरातील मालपाणी लॉन्स येथे आयोजित संगमनेर फेस्टिवल कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आला. आरोपी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (रा. खांडगाव, ता. संगमनेर) याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलीस गुन्ह्याचा सर्व बाजूनी तपास करत असून आरोपीला कोणी चिथावणी दिली किंवा कसे? आरोपी कोणाच्या संपर्कात होता? अन्य कोणी साथीदार आहेत किंवा कसे? या सर्व बाबींचा तांत्रिक पुराव्यांवरून तपास करण्यात येत आहे. तपासनंतर आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकरणी पोलिस यंत्रणा अधिक गोपनीयता बाळगत असल्याचे समोर आले आहे.
न्यायालयाने आरोपी गुंजाळ याला 2 सप्टेंबर पर्यंत (चार दिवस) पोलीस कोठडी दिल्याची माहिती श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिली.
तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणतीही चुकीची माहिती प्रसारित करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.








