संगमनेर : आमदार अमोल खताळ यांच्यावर गुरूवारी सायंकाळी एका तरूणाने हल्ला केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली. मालपाणी लॉन्स येथे ही घटना घडली असून प्रसाद गुंजाळ असे हल्लेखोराचे नाव आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हल्ल्याच्या निषेधार्थ आज प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो कार्यकर्ते आणि संगमनेरकर सहभागी झाले.
हल्ल्याच्या निषेधार्थ आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून प्रांत कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. सकाळपासुनच आमदार खताळ यांच्या जनसपंर्क कार्यालयाच्या बाहेर असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ९.३० वाजता सुरू झालेल्या या मोर्चात संगमनेरच्या नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मोर्चादरम्यान “हल्ला आमदारांवर नाही, तर जनतेच्या आवाजावर आहे” असा नारा देत हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या घटनेमुळे संगमनेर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या संगमनेरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचे शहरावर बारीक लक्ष आहे. दरम्यान पोलिसांनी हल्लेखोराची निपक्षपणे कसून चौकशी करून वस्तुस्थिती आणि सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.








