कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आमदार अमोल खताळ यांचं आवाहन

0
83

संगमनेर : संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमात जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे शहरात मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला आहे. जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीवर झालेल्या या हल्ल्यामुळे संगमनेर तालुक्यातील गुंडगिरी आणि दहशत पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

यासंदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स याठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांच्यावर हा हल्ला झाला आहे. प्रसाद गुंजाळ असे हल्लेखोराचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी हल्लेखोराला चांगलाच चोप दिला.

दरम्यान हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आमदार अमोल खताळ यांचे कार्यकर्ते चांगले आक्रमक झाले आहेत. हल्ल्यानंतर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.

आमदार अमोल खताळ यांनी शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सव सुरू आहे तो आनंदाने साजरा करा. पोलीस योग्य तो तपास करून कायदेशीर कारवाई करतील. असे आवाहन आमदार खताळ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here