इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

0
29

संगमनेर : राज्यात मराठा आरक्षणाची हलगी पुन्हा वाजली आहे. मनोज जरांगे मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. यासंदर्भात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रीया दिली आहे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे मत माजी मंत्री थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मांडले आहे.

आरक्षणाचा विषय हा न्यायालयाचा येतो, त्यामुळे त्यावर बोलण्यावर मर्यादा आहेत. परंतु, हे आंदोलन म्हणजे लोकचळवळ आहे. समाज संघटित होतो आहे, तेव्हा सरकारने त्यांच्या मागण्यांना मान देऊन तातडीने आरक्षण लागू केले पाहिजे. ओबीसी, आदिवासी व मागासवर्गीय यांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

संगमनेर शहरात थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी होऊन मराठा समाजातील गरीब घटकांच्या जीवनात आनंद व समृद्धी निर्माण व्हावी. सध्या देशात व राज्यात भाजपा प्रणित सरकार आहे. त्याचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे. केंद्र सरकार हे लोकशाहीला न पचणारे अनेक निर्णय घेत आहे. जनभावनेचा आदर करून आरक्षणाची टक्केवारी वाढवून घेतली पाहिजे. याकरिता केंद्राने पुढाकार घ्यावा.

मुंबईच्या आझाद मैदानात हळूहळू आंदोलक येण्यास सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानाकडे येत आहे. मोर्चामधील गर्दी आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून आझाद मैदानात दाखल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here