आठवड्याच्या शेवटी सलग सुट्ट्या आल्या. अनेकांनी फिरायला जायचे नियोजन केले असेल तर प्रवास करण्याआधी वाहतुक व्यवस्थेतील बदल जाणून घ्या. श्रावण महिना आणि पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट दरम्यान सलग तीन सुट्ट्या असल्याने पर्यटनस्थळांवर गर्दीची शक्यता आहे. पर्यटकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तीन दिवस एकेरी वाहतुक करण्याचे आदेश दिले आहेत.
राजुर पोलीस स्टेशन हद्दीत भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा, हरीशचंद्रगड, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर रतनवाडी, वाल्मीक ऋषीं आश्रम कोदणी अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. या भागातील अनेक रस्ते हे अरुंद असुन काही रस्त्यांचे दुरुस्तीचे काम चालु आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान वाहतुकीच्या नियमात बदल करण्यात आले आहेत.
रंधा फाटा येथुन भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद असणार आहे. शेंडी / भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथुन प्रवेश दिला जाणार आहे. एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा / वाकी फाटा (प्रवेश) चिंचोडीफाटा यश रिसोर्ट शेंडी भंडारदरा धरण असा असेल. स्पिल्वे गेट भंडारदरा गाव -गुहीरे रंधा असा बाहेर पडण्याचा मार्ग दिला गेला आहे.








