संगमनेर : शहरातील अकोले नाका चौकाला ‘वीरजवान संदिप घोडकर चौक’ तर गंगामाई परिसरातील दशक्रीया विधी घाटावरील केशव तिर्थास कै.संभाजीराजे थोरात यांचे नाव असे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले वीर जवान संदिप घोडेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी अकोले नाका चौकाला त्यांचे नाव द्यावे अशी मागणी आ.अमोल खताळ यांच्यासह शहरातील नागरीकांनी केली होती. वीरजवान संदिप घोडेकर यांचे देशाप्रती योगदान लक्षात घेवून त्यांचे नाव देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजीराजे थोरात यांच्या स्मरणार्थ दशक्रिया विधी घाटास त्यांचे नाव देण्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे. थोरात परिवाराने सामाजिक भावणेतून या परिसरात जागेची उपलब्धता करुन दिली. या परिसरात आसन व्यवस्था आणि सुशोभिकरणाची कामे करण्यात येणार असून, या भागाला कै.संभाजीराजे थोरात यांचे नाव देण्यासही प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे कलाक्षेत्रातील योगदान लक्षात घेवून कवी अनंत फंदी नाट्यगृहातील रंगमंचास तमाशा सम्राज्ञी कै.कांताबाई सातारकर यांचे नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, कलाक्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे संगमनेरची ओळख महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आदि राज्यांना होवू शकली. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी रंगमंचास नाव देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने ठरावाव्दारे केला आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिंच्या योगदानामुळेच संगमनेरचा नावलौकीक हा राज्यात आणि देशात होवू शकला. अशा व्यक्तिंच्या स्मृती जतन करण्यासाठी पालिका प्रशासनाने स्थानिक प्रतिष्ठानांना त्यांचे नाव द्यावे अशी आग्रही मागणी आपण केलेली होती. पालिका प्रशासनाने याबाबत घेतलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करीत असल्याचे आ.अमोल खताळ यांनी सांगितले.








