संगमनेर : तालुक्यातील नान्नज दुमाला येथे भोजापूर चारीच्या जलपूजन सोहळ्यासाठी उपस्थित डॉ. सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली. माजी मंत्री थोरात यांनी मागील अठरा वर्षात फक्त ५ कोटी रुपये खर्च केले. आता पुढच्या अडीच वर्षात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांच्या विकास कामाचे नियोजन केले असल्याची ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, ४० वर्ष सत्तेत राहून पाणी न आणणाऱ्यांना जनतेनं बाजूला केलं आणि महायुतीवर विश्वास ठेवला. आज त्या विश्वासाला कामातून उत्तर दिलं जात आहे. मी यापूर्वी शब्द दिला होता की ज्या दिवशी पाणी पोहोचेल, त्या दिवशीच मी इथे सभा घेईन आज तो दिवस आहे. ही केवळ सभा नाही तर जनतेच्या आश्वासनपूर्तीची साक्ष आहे.
डॉ. सुजय विखे म्हणाले की, आमदार अमोल खताळ यांनी हा संपूर्ण भाग पाणीदार करण्यासाठी जिद्दीने पाठपुरावा केला. जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा भाग आता जलसमृद्ध होतोय. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली याचा सार्थ अभिमान आहे. पुढील काळात दुष्काळी भागाला सुजलाम सुफलाम करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असा विश्वास यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाषणाच्या शेवटी एक खास विनंती करत सांगितले, नीलम ताईंनी आमदार अमोल भाऊंना सांगावे, की आम्ही विधानसभेत पाण्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची अजूनही उत्तरं मिळाली नाहीत. ती भाषणे घेऊन यशोधन कार्यालयात पोहोचवावीत, जेणेकरून आम्हाला त्यांची उत्तरं मिळतील. असा खोचक टोला डॉ. सुजय विखे पाटील यांनी थोरात यांना लगावला.
ही जलक्रांती केवळ विकासाचे प्रतीक नाही, तर सत्तांतरानंतर जनतेच्या अपेक्षांना मिळालेलं ठोस उत्तर आहे. महायुतीच्या नेतृत्वात संगमनेर तालुका जलस्वावलंबनाच्या दिशेने पुढे जात आहे. पाणी, रस्ते, शेती, शिक्षण, आरोग्य या साऱ्या क्षेत्रांतील कार्यक्षम नेतृत्वच खरा विकास घडवू शकते, असा ठाम विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते भीमराव चतर यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. कै. बाळासाहेब विखे पाटलांवर टीका करणाऱ्यांनी चार दशके काय केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बोलताना ते पुढे म्हणाले, आज विकासकामाचं उत्तर जनतेसमोर आहे. पाणी हा हक्क आहे, ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आले असल्याचे जेष्ठ नेते चतर यांनी सांगितले.
या जलपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना नीलम खताळ म्हणाल्या, वर्षानुवर्षं महिलांनी पाण्यासाठी होरपळ सोसली. आज त्या महिलांच्या प्रतीक्षेला न्याय मिळाला आहे. सुजय दादांनी आणि नामदार विखे पाटील साहेबांनी दिलेला शब्द आमदार अमोल भाऊंनी खरा करून दाखवला आहे. तालुका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, सौ. नीलम खताळ, माजी तालुकाध्यक्ष भीमराव चतर, शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे, संदीप देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








