शौर्याची हॅट्रिक! निमोणचे सुपुत्र पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांना तिसर्‍यांदा राष्ट्रपती शौर्य पदक

0
35

संगमनेर तालुक्यातील निमोण गावचे सुपुत्र आणि सध्या येवला येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप पुंजा मंडलिक यांना त्यांच्या धाडसाबद्दल तिसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक मिळाले आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान देण्यात आला.

पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले मंडलिक यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक मिळवणे ही गौरवशाली बाब आहे. गडचिरोलीच्या अतिदुर्गम जंगलांमध्ये नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान दाखवलेल्या धाडसी कामगिरीसाठी त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

२०१३ ते २०२४ या कालावधीत संदीप मंडलिक गडचिरोली येथे कार्यरत असताना, त्यांनी खोब्रामेंढा गावाजवळील घनदाट जंगलात झालेल्या एका मोठ्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खातमा करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली होती, ज्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला.

या शौर्यदायी कामगिरीबद्दल २९ जुलै रोजी त्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांना दोन वेळा अशाच प्रकारच्या अतुलनीय शौर्यामुळे राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरवण्यात आले आहे.

या ऐतिहासिक यशानंतर संगमनेरचे आमदार अमोल खताळ, निमोण ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप देशमुख, तसेच संपूर्ण गावकऱ्यांनी, नातेवाईक व मित्रपरिवाराने मंडलिक यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या अशा वीर अधिकाऱ्यामुळे संपूर्ण तालुक्याचा अभिमान वाढला आहे. संदीप मंडलिक यांचे शौर्य आणि सेवाभाव अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here