विखे, खताळ, थोरातांचे फ्लेक्स अज्ञातांनी फाडले, कोण तापवतंय संगमनेरचं राजकारण?

0
62

संगमनेर :  तालुक्यात सध्या फ्लेक्स लावण्याऐवजी फ्लेक्स फाडण्याच्या घटनांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अकोले नाका, खांडगाव व वडगाव येथील डॉ. सुजय विखे पाटील, आमदार अमोल खताळ आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या फ्लेक्सची छेडछाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात आणि तालुक्यात तर्कवितर्कांना उधाण आले असून समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी (ता. २६ जुलै) सकाळी सहा वाजता अकोले नाका येथे लावलेला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फ्लेक्स फाटलेला आढळून आला. विशेष म्हणजे या फ्लेक्सवरील डॉ. विखे यांचा चेहराच फाटल्याचे स्पष्ट दिसून आले.

दरम्यान, शनिनारीच सकाळी ६.३० वाजता खांडगाव येथे आमदार अमोल खताळ यांनी श्रावण मासारंभ निमित्ताने लावलेला शुभेच्छा फ्लेक्सदेखील फाटल्याचे आढळून आले. या फ्लेक्सवरदेखील आमदार खताळ यांचा चेहरा फाटल्याचे दिसले.

रविवारी (ता. २७ जुलै) दुपारी वडगाव येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फ्लेक्स अज्ञात व्यक्तीने फाडल्याची चर्चा आहे. या ठिकाणीही थोरात यांच्या चेहऱ्याचा भाग फाटल्याचे निदर्शनास आले.

या तिन्ही घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामागे कोण आहे, याचा तपास सुरू असून शहर आणि तालुका पोलिसांत अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, आमदार खताळ समर्थकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “फ्लेक्सवरची प्रतिमा फाडता येईल, पण जनतेच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा कोणीही फाडू शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here