अतिक्रमण केल्याने सरपंचपद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांची संगमनेरमधील रायते गावच्या सरपंचावर कारवाई

0
43

संगमनेर :  तालुक्यातील रायते गावच्या सरपंच रुपाली गौतम रोहम यांनी गावात घर बांधकामादरम्यान अतिक्रमण केल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करण्यात आले. अतिक्रमणाच्या कारणावरून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. सदस्यपद रद्द केल्याने त्यांचे सरपंचपदही आपोआप रद्द झाले आहे.

रायते गावातील एका तक्रारीनंतर या प्रकरणाची सुरुवात झाली. संगमनेर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने रायते गावात पाहणी करून पंचनामा सादर केला. या पंचनाम्यानुसार सरपंच रोहम या आपल्या सासू-सासऱ्यांच्या नावे असलेल्या मिळकतीत राहत होत्या आणि त्या मिळकतीमध्ये बांधकाम करताना अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. तपशीलांच्या विचारांती तक्रारदाराचा अर्ज ग्राह्य धरत जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच रुपाली रोहम यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला. परिणामी, त्यांचे सरपंचपदही रद्द झाले आहे.

दरम्यान, हा निर्णय फक्त रायते ग्रामपंचायतीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा ठरला आहे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी स्वतःच्या पदाचा गैरवापर न करता नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, याची आठवण या निर्णयाने करून दिली आहे. पुढील काळात अशा प्रकारच्या तक्रारींवर प्रशासन कठोर पावले उचरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here