संगमनेर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पोलिस यंत्रणा सतर्क झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी परिसरातील बेकायदेशीर कामे बंद होत नाहीत. तालुक्यातील कुरण गावातील काटवाचा परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांनी काल मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत ५५० किलो गोमांसासह विविध साहित्य जप्त करण्यात आले असून, एकूण २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत झाला आहे.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अचानक धाड टाकली. मात्र कारवाईची कल्पना लागताच चार अज्ञात आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. जप्त केलेल्या साहित्यामध्ये १ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचे गोमांस, ७० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल, तसेच लोखंडी सुरा आणि कुऱ्हाड यांचा समावेश आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक रोहिदास शिरसाठ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर ६७४/२०२५ अन्वये भारतीय दंड संहितेची कलमे २७१, ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९९५ आणि सुधारित अधिनियम २०१५ चे कलम ५ (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्याचे संकेत स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. पशु संरक्षणासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच, अवैध कत्तलखान्यांच्या विरोधात गुप्त तपास मोहीम राबविण्याची गरज आहे.








