तुकडाबंदी कायदा उल्लंघन प्रकरणी संगमनेरातील दोन मंडळ अधिकारी व पाच तलाठी निलंबित, महसूलच्या एकूण १० अधिकऱ्यांवर कारवाई

0
58

संगमनेर तालुक्यात शासनाच्या तुकडाबंदी आदेशाचा भंग करत ग्रीन आणि येलो झोनमधील जमिनींचे बेकायदेशीर तुकडे करून स्वतंत्र सातबारा तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंडल अधिकारी इरप्पा काळे, बाबाजी जेडगुले आणि तलाठी रोहिणी कोकाटे, अलोकचंद चिंचुलकर, धनराज राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जागृत सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे संबंधित मंडल अधिकारी व तलाठी यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई झाली आहे.

यापूर्वीही अशाच प्रकारात पाच महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यामुळे आतापर्यंत एकूण दहा महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असून महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र जमीन तुकडाबंदी अधिनियम १९४७ नुसार शेतीयोग्य जमिनीचे लहान लहान तुकडे होऊ नयेत म्हणून रेड, येलो आणि ग्रीन झोनमध्ये जमिनीचे तुकडे करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. मात्र, सदर कर्मचाऱ्यांनी कोणतेही अधिकृत रेखांकन अथवा नियोजन मंजुरी न घेता रहिवासी वापर आणि प्रादेशिक आराखड्याच्या नावाखाली जमिनीचे बेकायदेशीर विभाजन केले.

दरम्यान, असे प्रकार सातत्याने उघडकीस आल्यामुळे महसूल प्रशासनातील शिस्तबद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने तुकडे करून शासनाच्या धोरणालाच सुरुंग लावण्याचे काम केले आहे. अशा प्रकारच्या अनियमित कारभारामुळे सामान्य शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई आणि नियंत्रण यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज आहे. शासनाने आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here