तळेगाव व निमोणचा नदीजोड प्रकल्पात समावेश करा; आमदार अमोल खताळ यांच्याकडे मागणी

0
40

निमोण (ता. संगमनेर) :  दुष्काळग्रस्त तळेगाव व निमोण परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे या भागातील शाश्वत जलसिंचनासाठी दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात तळेगाव निमोण व पंचक्रोशीतील गावांचा समावेश करण्यात यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक ही मागणी करत आहेत. मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला गेला. आता यासंदर्भात निमोण ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच संदिप देशमुख यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पातून सध्या सिन्नर तालुक्याच्या काही भागांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. मात्र, या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात तळेगाव व निमोण या सीमावर्ती भागांचा समावेश नसल्यामुळे शेतकऱ्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे तळेगाव व निमोण परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत असून, सिंचनाअभावी शेती उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून पिण्याच्या पाण्यासाठीही उन्हाळ्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सद्यस्थितीत सिन्नर तालुक्यासाठी १७,९६० हेक्टर क्षेत्र हे लाभक्षेत्र म्हणून प्रस्तावित आहे. मात्र, तळेगाव व निमोण हे सिन्नरच्या सीमेलगतच असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या या भागाचा समावेश प्रकल्पात करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तळेगाव-निमोण परिसरातील स्थानिक नागरिकांकडून होणाऱ्या या मागण्यांची अंमलबजावणी झाल्यास याठिकाणी सिंचनाची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन शेतीक्षेत्र वाढेल. त्याचबरोबर औद्योगिक आणि ग्रामीण विकासालाही गती मिळेल. पाण्याचे नियोजनबद्ध वितरण हे या दुष्काळी भागासाठी दीर्घकालीन उपाय ठरू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here