आ. अमोल खताळांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलीस यंत्रणा सक्रिय, कत्तलखान्यावरील छाप्यात १२.५ लाखांचे गोमांस जप्त

0
58

संगमनेर : आमदार अमोल खताळ यांनी पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला खोटी माहिती देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विधानसभेत केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने शहरातील अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचा धडाकाच लावला आहे. पोलीस पथकाने काल (बुधवारी) बेकायदा कत्तलखान्यावर छापा टाकत सुमारे १२.५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र याही वेळी आरोपी पसार झाले.

शहरात गेल्या अनेक वर्षांपासुन अवैध कत्तलखाने सुरु आहेत. यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करूनही ठोस कारवाई होत नव्हती. मात्र आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलीस यंत्रणा चांगलीच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पंधरा दिवसात तीन वेळा संगमनेर शहरातील बेकायदा कत्तलखान्यांवर विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.   

मध्यरात्री दीडच्या सुमारास शहरातील तीन बत्ती चौकात थांबलेले पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना मदिनानगर परिसरातील गल्ली नंबर ५ येथील फैजु फारुक कुरेशी यांच्या पत्र्याच्या वाड्यात कमरअली गुलाम जिलानी सौदागर आणि शहबाज बुढन कुरेशी हे गोवंश जनावरांची कत्तल करत आहेत, अशी माहिती मिळाली. पोलीस नाईक राहुल कचरु डोके, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कडलग आणि कॉन्स्टेबल राहुल सारबंदे त्यांच्या पथकाने फैजु फारुक कुरेशी यांच्या वाड्यावर छापा टाकला. पोलिसांना पाहताच आरोपी कमरअली गुलाम जिलानी सौदागर आणि शहबाज बुढन कुरेशी यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

घटनास्थळी एकूण १२ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे. या संदर्भात पोलीस नाईक राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कमरअली गुलाम जिलानी सौदागर, शहबाज बुढन कुरेशी (दोघे रा. जमजम कॉलनी, संगमनेर) आणि त्यांना जागा उपलब्ध करून देणारा फैजु फारुक कुरेशी (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) या तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३५ वासरांची सुटका

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली ३५ वासरे ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई कुरण येथील कब्रस्तानजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. कुरण येथील शौकतअली मोहम्मद शेख (वय ३०, रा. कुरण) याने आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्याची माहिती मिळाली होती.

स्थानिक पोलीस प्रशासनाने बेकायदा कत्तलखान्यांविरोधात आता आक्रमक कारवाई सुरु केली असली तरी मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या हाताबाहेर आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विधानसभेतील आक्रमक भुमिकेनंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून, पुढील काळात अशा बेकायदा कत्तलखान्यांचा पूर्णपणे बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या प्रकरणातील मुळ सूत्रधाराला तातडीने अटक करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here