संगमनेर : लालपरीने प्रवास करणार्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. संगमनेर एसटी आगाराला १० नवीन बसेस मिळाल्या आहेत. आज या नवीन बसचा लोकार्पण सोहळा संगमनेर बसस्थानक परिसरात आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यामुळे आता संगमनेरकरांना प्रवासासाठी अधिक सुविधा मिळणार आहेत.
संगमनेर आगारात या नवीन बसचा लोकार्पण आणि वाहनपूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी धार्मिक रितीरिवाजानुसार नवीन बसेसची पूजा करण्यात आली. यानंतर आमदार अमोल खताळ यांनी प्रसंगी उपस्थित नागरिक आणि सहकाऱ्यांसह बसमधून प्रवास केला.
संगमनेर आगारातील अपुऱ्या एस.टी. बसेसमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना व नोकरदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. नवीन १० बसेसमुळे त्यांची अडचण नक्कीच दूर होणार आहे. या आधुनिक लालपरीमुळे प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याने संगमनेरकर प्रवाशी समाधान व्यक्त करत आहेत.
आमदार अमोल खताळ संगमनेरच्या विकासासाठी सतत विविध विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांनी संगमनेर एसटी आगारासाठी नवीन बसची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. २३ जानेवारी रोजी परिवहन मंत्र्यांना याबाबत पत्र देण्यात आले. त्यानंतर २४ मार्च २०२५ रोजी मुंबईत संगमनेरच्या प्रश्नांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी आमदार अमोल खताळ यांची चर्चा झाली होती.
दरम्यान, या चर्चेनंतर लगेच २९ मार्च रोजी पहिल्या ५ बस संगमनेरमध्ये आल्या. आज आणखी ५ नवीन बसेस संगमनेर आगारात दाखल झाल्या आहेत. अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण १० बसेस संगमनेरला मिळाल्या असून, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच, संगमनेर बसस्थानक परिसरात शिवसृष्टी उभारण्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी जागा देण्याबाबत देखील चर्चा सुरू आहे. त्यासोबतच संगमनेरमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू व्हावे, अशी मागणीही आमदार अमोल खताळ यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.
बी.ओ.टी. व्यापारी संकुलास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणीही मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली असल्याचे अमोल खताळ यांनी सांगितले. या सर्व मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू असून, लवकरच याबाबत चांगले निर्णय अपेक्षित आहेत. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या लोकार्पण कार्यक्रमाला शिवसेना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महामंडळाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह संगमनेर तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.








