संगमनेर बाजार समितीत ड्रॅगनफ्रूट, पेरू आणि डाळिंबाची आवक वाढली; शेतकऱ्यांना समाधानकारक भाव

0
41

संगमनेर : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या ड्रॅगनफ्रूट, पेरू आणि डाळिंब या शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने त्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे, ड्रॅगनफ्रूटची प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर बाजारात आवक झाली असून, स्थानिक तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा याकडे वाढता कल दिसत आहे.

तालुक्यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी नवा प्रयोग म्हणून ड्रॅगनफ्रूटची शेती सुरू केली होती. मात्र, थेट बाजारपेठ उपलब्ध नसल्याने या शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. आता संगमनेर बाजार समितीमध्ये ड्रॅगनफ्रूटचा लिलाव सुरू झाल्याने संगमनेरसह अकोले, राहाता, सिन्नर या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या ड्रॅगनफ्रूटला किमान ५० रुपये ते कमाल ८० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. दरम्यान, डाळिंबाचीही आवक चांगल्या प्रमाणात असून, एका दिवसात जवळपास ३ हजार क्रेटची नोंद झाली आहे. डाळिंबाला प्रतिकिलो किमान १०० रुपये ते कमाल २५१ रुपये इतका भाव मिळत आहे. तसेच, पेरू, कांदा, टोमॅटो आदी शेतमालाची खरेदी-विक्री देखील जोरात सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची योग्य प्रतवारी करूनच बाजार समितीत विक्रीसाठी आणावा, जेणेकरून त्यांना योग्य दर मिळेल, असे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर आणि संचालक मंडळाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here