साडेचार हजार गोरगरिब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, आमदार अमोल खताळ यांचा अनोखा उपक्रम

0
95

संगमनेर : आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून जमा झालेले शालेय साहित्य मतदार संघातील विविध गावांना आणि वाडीवस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सुमारे साडेचार ते पाच हजार गोरगरिबांच्या मुलांना भेट देण्यात आले. आमदार अमोल खताळ यांच्या या समाजप्रेरित स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असताना अनेक गोरगरीब कुटुंबातील मुलांना वह्या, पुस्तके, दप्तर, पेन, पेन्सिल, खोडरबर, कंपास पेटी यांसारख्या वस्तू खरेदी करणे खूप अवघड होते. विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून आमदार खताळ यांनी सामाजिक भान राखत आपला वाढदिवस विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलणार्‍या उपक्रमात रूपांतरित केला.

वाढदिवसानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी हारतुरे, पुष्पगुच्छ, शाल, केक नको, त्याऐवजी शालेय साहित्य दान करा” असे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनास उत्स्फूर्तप्रतिसाद देत नागरिक, शिक्षकवर्ग व सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य आणले होते. ते सर्व जमा झालेले शालेय साहित्य मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मार्फत जिल्हा परिषद शाळांमधील गोर गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.

विशेष म्हणजे काही शाळांमध्ये साहित्य अपुरे पडू लागले ही माहिती आमदार अमोल खताळ यांना समजताच, माझ्या मतदारसंघातील गोरगरीब विद्यार्थी वह्या पुस्तकाविना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून, खताळ यांनी स्वतःच्या पगारातून पन्नास हजार रुपये खर्च करत ते उर्वरित शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वितरित केले.आमदार खताळ यांचा छोटासा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

या उपक्रमामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आले असून आमदार खताळ यांच्या सामाजिक उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here