विद्यार्थ्यांना वर्गातच मिळणार एसटी पास; विद्यार्थिनींना मोफत पास

0
62

संगमनेर : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या सूचनांनुसार राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये वितरित केले जात आहेत.

महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या मार्ग परिवहन अहिल्यानगर विभागातील अधिकारी, कर्मचारी हे जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमध्ये जाऊन नियमित एसटी बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींची माहिती संकलित करून त्यांना पास वितरित करीत आहेत. शिक्षणासाठी बसमधून प्रवास करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनींची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.

संगमनेर तालुक्यात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणावर संगमनेर शहरात शिक्षणासाठी येतात. शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो.

शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यापूर्वी विद्यार्थी, विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घ्यावे लागायचे, आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.

मागच्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना शाळेतच पास देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. यंदाही ही मोहीम राबवली जाणार आहे. तत्पूर्वी, सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी देण्यास सांगितले आहे. एसटी महामंडळाच्या या मोहिमेमुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनिंना मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here