संगमनेर : संगमनेर तालुक्यातील नागरिकांच्या विविध शासकीय गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर योजने अंतर्गत विविध दाखले देण्यासाठी तालुक्यातील मंडल निहाय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला संगमनेरला येण्याची गरज न पडता त्यांच्या गावाजवळच या समाधान शिबिराच्या माध्यमातून विविध प्रमाणपत्रे शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे या शिबिरातून नागरिकांना उत्पन्नाचा जातीचा रहिवास, नॉन क्रिमिलिअर हे सर्व दाखले तसेच शिधापत्रिका (नवीन /दुबार), रेशन कार्ड, अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय योजना, मतदार नोंदणी, फेर फार अर्ज, निवडणूक ओळखपत्र, आधार अपडेशन, पीएम मातृ वंदना योजना, पीएम कृषी सिंचन योजना, मका बियाणे वाटप, किसान कार्ड, स्तनदा माता वैद्यकीय तपासणी अशा विविध सेवाउपलब्ध होणार आहेत.
वर्षभरातून दोन वेळा सर्व महसूल मंडळांत या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिराचा सर्वच नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना लाभ घेता यावा यासाठी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जनजागृती करावी या समाधान शिबिराचा सर्वांनी लाभघ्यावा असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
महायुतीच्या कार्यकर्त्यांना जनजागृतीचे आवाहन :
महायुतीच्या वतीने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांना सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावागावांत, वाड्यावस्त्यांमध्ये या शिबिरांची माहिती पोहोचवावी, जेणेकरून अधिकाधिक नागरिकांना या शिबिरांचा लाभ घेता येईल. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि गरजू नागरिकांसाठी या शिबिरांमधून मोठा फायदा होणार असल्याने त्यांना मार्गदर्शन करावे, अशी सूचना देण्यात आल्या आहेत.








