संगमनेर (प्रतिनिधी): राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर येथील शिवसेना महायुतीच्या वतीने विविध पवित्र धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले. हा संपूर्ण कार्यक्रम श्री दत्त मंदिर, बस स्टँड परिसर, संगमनेर येथे भक्तिमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी संगमनेरचे आमदार मा. अमोल खताळ हे सपत्नीक उपस्थित होते.
यावेळी रुद्र याग, मार्कंडेय आराधना, सप्त चिरंजीव व नक्षत्र देवता पूजन, हवन व आशीर्वाद मंत्रपठण असे विविध धार्मिक विधी पार पडले. प.पू. भाऊ जाखडी गुरुजी व त्यांच्या सहकारी ब्रह्मवृंदांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने संपूर्ण पूजन विधी संपन्न झाले. मंत्रोच्चारांच्या गजरात परिसरात एक आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजहिताचे यशस्वी कार्य सुरू राहो अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमाला शिवसेना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच संगमनेर आणि परिसरातील श्रद्धावान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








