संगमनेर : कोल्हार-घोटी राज्यमार्गावर कोकणगाव येथे ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकणगावजवळ रविवार पहाटे ६.४५ वाजेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्स व ट्रकची समोरासमोर धडक होऊन दुर्घटना घडली. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघातामुळे राज्यमार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. प्रसंगी पोलीस प्रशासन, वैद्यकीय पथक आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तात्काळ प्रतिसादामुळे अनेकांचे प्राण वाचवणे शक्य झाले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी उपचार घेणार्या जखमी अपघातग्रस्तांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली.
या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशासनाने अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. सद्यस्थिती नियंत्रणात असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.








