ठेकेदारांना लाभ देण्यासाठी बाधित शेतकऱ्यांना वेठीस धरू नका – रोहिदास राहणे यांची टीका

0
140

संगमनेर प्रतिनिधी : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी २०११ पासून शेतकरी शासन दरबारी मागणी करत आहेत. मात्र, सत्ता असताना शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारे नेते आज अचानक पुढे येऊन काम सुरू करण्याचा आग्रह धरत आहेत. काँग्रेसचे हे नेते व त्यांच्या सहकाऱ्यांना ठेकेदारांकडून मलिदा मिळवण्यासाठीच शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप चंदनापुरीचे माजी सरपंच रोहिदास राहणे यांनी केला आहे.

२०११ मध्ये पुणे-नाशिक महामार्ग चौपदरीकरणाच्या वेळी चंदनापुरी, आनंदवाडी, हिवरगाव पावसा, रायतेवाडी, खांडगाव या गावांतील सुमारे २५२ शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांना केवळ तुटपुंजा मोबदला देण्यात आला. त्यानंतर या शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्यासाठी लवादात अर्ज सादर केला, मात्र २०२५ पर्यंत त्यांना काहीही मिळाले नाही.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन मदतीची विनंती केली. आमदार खताळ यांनी तात्काळ प्रांताधिकारी, तहसीलदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून शेतकऱ्यांना लवकरात लवकर वाढीव मोबदला देण्याचे निर्देश दिले. मात्र, यानंतरही मोबदला मिळाला नाही, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम थांबवले.

यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोणी येथे कार्यक्रमासाठी आले असता आमदार खताळ यांनी बाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांची भेट घेतली. गडकरींनी शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

तरीही सत्ता असताना या काँग्रेस नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. आता मात्र काम सुरू करून ठेकेदारांना फायदा करून देण्यासाठी हेच नेते पुढे सरसावत आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी प्रशासनाकडे निवेदने देऊन त्यांना कामात अडथळा आणणारे म्हणून दर्शवले जात आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जर याच नेत्यांनी वेळेवर प्रयत्न केले असते, तर आज काम थांबवण्याची वेळ आली नसती. त्यांच्या या भूमिकेमुळे आनंदवाडी, चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा, रायतेवाडी, खांडगाव, कासारा दुमाला, गुंजाळवाडी येथील शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. विलास सरोदे, वसंत गुंजाळ, अशोक वर्पे आदी शेतकऱ्यांनी काँग्रेस नेत्यांवर ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा गंभीर आरोप केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here