मुंबई : संगमनेर विधानसभा मतदारसंघातील मौजे ढोलेवाडी येथील श्रीमती सिताबाई विष्णू सुर्यवंशी या ७० वर्षीय आदिवासी समाजातील वयोवृद्ध, निराधार महिलेसोबत त्यांच्या अपंग मुलाच्या नावावरील जमिनीवर फसवणूक करून मालकी परस्पर हस्तांतरित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत आ. अमोल खताळ यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी लेखी निवेदन सादर करत या प्रकरणाची सखोल चौकशी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्यामार्फत करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जमिनीचा प्रकार आणि अन्याय
सदर जमीन गट क्र. १८/१, मौजे ढोलेवाडी या ठिकाणी असून त्यातील ०.१८ गुंठे क्षेत्र राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झाले आहे. मात्र उर्वरित सामुदायिक क्षेत्र काही व्यक्तींनी खोट्या खरेदीखताद्वारे, धमकी आणि दमदाटीच्या आधारे बळकावले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणावर दोन दिवाणी खटले सध्या संगमनेर न्यायालयात सुरू आहेत, तरीही वाहन जाळणे व दहशत निर्माण करून जमीन बळकावण्याचे प्रकार सुरू आहेत.
आमदार खताळ यांचा तातडीचा हस्तक्षेप
या प्रकरणाबाबत सदर पीडित महिलेनं आमदार अमोल खताळ यांच्याकडे निवेदन दिलं होतं. यानंतर आमदार खताळ यांनी महसूलमंत्र्यांकडे पाठपुरावा करत, हे आदिवासी हक्कांवर घाला घालणारे कृत्य असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी मंत्र्यांकडे सखोल चौकशी व कारवाईची मागणी करत, विभागीय आयुक्त, नाशिक यांना तपासाची जबाबदारी देण्यात यावी असं सुचवलं.
“एक वयोवृद्ध आदिवासी महिला आणि तिचा अपंग मुलगा, यांच्या जमिनीवर दबाव, दमदाटी, फसवणूक आणि बेकायदेशीर हस्तांतर हे केवळ कायद्यानं नव्हे तर माणुसकीनंही स्वीकारण्याजोगं नाही. मी महसूलमंत्र्यांकडे याबाबत सविस्तर निवेदन दिलं असून, चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापनेची विनंती केली आहे.”
— आ. अमोल खताळ, आमदार, संगमनेर विधानसभा








