मुंबई : पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटात ४ जुलै रोजी घडलेल्या स्कूल बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत महामार्गावरील अपुऱ्या उपाययोजनांवर आणि ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी मतदारसंघातील विविध मुद्द्यांवर विधानसभेत आवाज उठवला आहे. पुणे-नाशिक महामार्गवर अपघातांचे प्रमाण वाढत आहे, यामागे रस्त्यांची कामे चालू असताना संबंधित ठेकेदार आणि कंपनीचा हलगर्जीपणा यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा आहे. असे असताना आमदार अमोल खताळ यांनी चंदनापुरी घाटातील स्कूलबसच्या अपघाताचा दाखला देत, दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
विधानसभेत बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले, चंदनापुरी घाटात ४ जुलै रोजी भरधाव ट्रक समोरून येत असताना समोरासमोर धडक होऊ नये म्हणून स्कूलबस चालकाने प्रसंगावधान राखून बस साईडला घेतली. त्यामुळे बसमधील १६ विद्यार्थी जखमी झाले होते. पुणे-नाशिक महामार्गाचं सिमेंट काँक्रीटचे काम सध्या सुरू असून तिथे एकेरी वाहतूक सुरू आहे, यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
तसेच, पुणे-नाशिक महामार्गावरच्या १ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२५ या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये ४८ अपघात होऊन, त्यामध्ये १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खेड-सिन्नर रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामात शंकर रामचंद्र इन्फ्रा या ठेकेदार कंपनीकडून एन. एच. ए. आय. सोबतच्या केलेल्या कराराचा सर्रास भंग होताना दिसून येत आहे. ठेकेदार कंपनी काम करताना सुरक्षेच्या उपाययोजना व्यवस्थित करत नसल्यामुळे अपघात होऊन रोज तिथे वाद-विवाद होत आहेत.
शंकर रामचंद्र इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळेच अपघात होत आहेत. यापूर्वीच्या अपघातांना त्यांना जबाबदार ठरवण्यात यावे. ज्या स्कूल बसचा अपघात झाला होता त्या स्कूल बसला सुद्धा नियमानुसार परिवहन विभागाने परवानगी दिली होती का? महाराष्ट्रातील सर्व स्कूल बस फिटनेस व नियमानुसार आहेत की नाहीत याचे ऑडिट होणे गरजेचे आहे. अशी भूमिक आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत बोलताना मांडली आहे.
यावेळी बोलताना आमदार खताळ यांनी सरकारला विनंती केली की, रस्त्यांची कामे चालू असताना, ठेकेदार कंपनी सुरक्षेसंबंधी उपाययोजना करत नाही अशा कंपनीवर कारवाई करण्यात यावी.
यानिमित्ताने आमदार अमोल खताळ यांनी अपघातग्रस्त कुटुंबीयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. रस्त्याचे काम करताना नागरिकांच्या जिवाशी खेळले जाऊ नये, अशी अपेक्षा प्रवासी नागरिक व्यक्त करत आहेत.








