संगमनेर – संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत विरोधीपक्षाकडून आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू होती. तालुक्यातील विविध भागांतील ऊस उत्पादक सभासदांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा लाभत होता. मात्र, निवडणूक प्रक्रियेत अडथळे, अयोग्य अटी, आणि सभासदांच्या अपमानास्पद वागणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माघार घेण्यामागील कारणं:
मतदार याद्यांबाबत अडचणी: वेळेवर याद्या उपलब्ध न झाल्यामुळे सभासदांना आक्षेप घेण्याची संधी नाकारली गेली.
जाचक पोटनियम: उशिरा जाहीर झालेल्या पोटनियमांमुळे अनेक सभासद निवडणुकीपासून वंचित राहिले. सलग तीन वर्ष ऊस पुरवणं, जनरल मीटिंगला उपस्थिती अशा अटी लागू करण्यात आल्या.
विरोधकांचा अपमान: जनरल मीटिंगमध्ये विरोधी गटाच्या लोकांना बोलण्याची संधी नाकारली गेली. स्टेजवर बोलण्यासही मनाई करण्यात आली.
कारखान्याच्या निधीचा दुरुपयोग: कोट्यवधी रुपयांच्या निधीचा वापर केवळ निवडणूक जिंकण्यासाठी करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माघार म्हणजे हार नव्हे:
आ.अमोल खताळ यांनी स्पष्ट केलं की, ही माघार हार म्हणून नव्हे तर सभासदांच्या हितासाठी जबाबदारीची भूमिका म्हणून घेतली आहे. बिनविरोध कारखाना होणे हे त्यांचं उद्दिष्ट नव्हतं, मात्र सभासदांचा पैसा, प्रतिष्ठा आणि सहकार चळवळीची मूल्यं वाचवण्यासाठी हा निर्णय अनिवार्य होता.
सभासद हे कारखान्याचे खरे मालक आहेत. ही संस्था कोणाच्या एकट्याची नाही. आम्ही लढाई थांबवली असली तरी आवाज कायम राहील. सभासदांचं हित हेच आमचं अंतिम ध्येय आहे, असं मत आमदार अमोल खताळ यांच्याकडून व्यक्त करण्यात आलं.








