संगमनेरात बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस, एक व्यक्ती ताब्यात

0
106

संगमनेर, २० फेब्रुवारी २०२५ – संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी येथे बनावट नोटा छापण्याच्या प्रकाराची माहिती समोर आली आहे. गुप्तचर विभाग पुणे आणि संगमनेर शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गुरुवारी (दि. २०) सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास एका घरावर छापा टाकला गेला. यावेळी बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य तसेच एक व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

गुंजाळवाडीतील रहाणे मळ्यातील रजनीकांत राजेंद्र रहाणे या व्यक्तीने आपल्या घरात बनावट नोटा छापण्यासाठी आवश्यक साहित्य जमा केले होते. त्याने कुरिअरद्वारे नोटा छापण्यासाठी लागणारे विशेष पेपर मागवले होते. याबाबत पुणे गुप्तचर विभागाला माहिती मिळाली होती. त्यावरुन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोकॉ. हरिश्चंद्र बांडे आदींनी रहाणे मळ्यातील गुंजाळ याच्या घरी छापा टाकला.

पोलिसांच्या तपासादरम्यान, रहाणे यांच्या घरातल्या पहिल्या मजल्यावर शंभर पेपर आढळले. या पेपरांचा वापर बनावट नोटा छापण्यासाठी करण्यात येत असल्याचा अंदाज पोलिसांना लागला. याशिवाय, घरातील एका कचर्‍याच्या डब्यात फाडलेले पेपर आणि भारतीय चलनातील शंभर व पाचशे रुपयांच्या नोटांच्या तुकड्यांचा पुरावा सापडला.

पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर, रजनीकांत रहाणे याचा मोबाईल फोन देखील तपासला, आणि त्यात बनावट नोटा छापण्यासंबंधी अतिरिक्त माहिती मिळाली. या कारवाईत एक प्रिंटर, बनावट नोटांचा साचानुसार छापलेले पेपर, फाडलेले नोटांचे तुकडे आणि इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले.

संगमनेर शहर पोलिसांनी गुप्तचर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या फिर्यादीवरून रजनीकांत राजेंद्र रहाणे याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे संगमनेर क्षेत्रात बनावट नोटांची विक्री आणि तयार करण्याच्या कामकाजावर कडक नियंत्रण ठेवण्याची ग्वाही मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here