संगमनेरमध्ये ४० वर्षांत पहिल्यांदाच भव्य शिवजयंती सोहळा; आमदार अमोल खताळ

0
98

संगमनेर: “संगमनेरमध्ये ४० वर्षांत पहिल्यांदाच शिवजयंती इतक्या जल्लोषात साजरी होत आहे. हा केवळ एक सोहळा नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतीक आहे. यापुढे दरवर्षी शिवजयंती हा सोहळा असाच दिमाखात साजरा झाला पाहिजे!” असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले.

शिवसेना महायुती संगमनेरच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याला शिवप्रेमींचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. १७ मार्चला शिवजयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. त्या निमित्ताने संगमनेर बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन आमदार अमोल खताळ व त्यांच्या नीलमताई खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराजांना पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली.

शिवजयंतीचा ऐतिहासिक सोहळा

सोमवारी, १७ मार्च रोजी सकाळी ६:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवपूजन व ७ वाजता महाआरती होणार आहे.

४० वर्षांनंतर पहिल्यांदाच भव्य मिरवणूक

संध्याकाळी ५ वाजता शास्त्री चौक, नगरपरिषद येथून भव्य मिरवणूक निघणार असून, ही मिरवणूक संगमनेरच्या इतिहासातील सर्वात मोठी असेल. या मिरवणुकीत –वारकरी गजर, ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, झांज पथक, आदिवासी नृत्य, अघोरी नृत्य आणि भव्य आतिषबाजी असे विविध आकर्षण असणार आहे.

शिवप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

“शिवजयंती हा मराठ्यांच्या अस्मितेचा उत्सव आहे. संगमनेरमध्ये ४० वर्षांनंतर पहिल्यांदाच शिवजयंती इतक्या भव्य स्वरूपात साजरी होत आहे. यापुढे प्रत्येक वर्षी हा सोहळा अधिक भव्य होईल,” असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

सर्व शिवप्रेमींनी या ऐतिहासिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here